बुधवार, १५ मे, २०१३


कथेचा विषय (subject)
A film cannot be any good if it isn’t well written.


ERNEST LEHMAN  
बर्याचदा आपणास कथा सापडते पण खुपदा संपूर्ण कथा गवसत नाही. एखादा विषय आपणास भावतो. उदा. लहान मुलांच्या शिक्षण संबधीच्या समस्या (तारे जमिन पर ), किंवा सरळ सरळ कथा मिळते लगान माफी मिळवण्या साठी क्रिकेट मैच (लगान)
कथा नक्की झाली तर आपणास त्या संबधी संशोधन करावे लागते, आपल्या कथेचा काळ कोणता ? उदा. स्वातंत्र पूर्वीचा ? पेशवे कालीन ? इ. त्या लोकांची भाषा, बोलण्याची लकब, पेहराव इ. बाबतीत सखोल  माहिती मिळवावी लागते. कथा सर्वथा काल्पनिक असेल तर ती भाषा कशी असेल ? वेशभूषा कशी असेल ? घरे फर्निचर शोभेच्या वस्तू, वाहने काय काय शोधावे लागेल हि यादी खूप वाढत जाणारी असते.
पण विषय निश्चिती अगोदर केली तर आपणास जरा जास्त संशोधन करावे लागते. त्या विषयाच्या अनुषंगाने काय काय लिखाण झाले  आहे ? कोणत्या फिल्म बनल्या आहेत ? त्या विषयीच्या विविध लेखांचा अभ्यास ? त्या विषयातील तज्ञांच्या मुलाखती घेणे, त्या अनुसार कथेची अथवा प्रथम पात्राची (Hero) निर्मिती करावी लागते.
एकंदर विषयातून कथा किंवा सरळ कथा मिळाली म्हणजे काम पूर्ण झाले असे समजू नये कारण आता खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झालेली असते. स्क्रीन रायटर चे काम फक्त डायलॉग आणि त्यांच्या कृती (activity) लिहिणे नसते. स्क्रीन रायटर ला संपूर्ण एकसंध कथेचे वेगवेगळे तुकडे करावयाचे असतात. कोणकोणत्या ठिकाणी हि कथा घडते त्यानुसार ! कोणकोणत्या वेळेला हि कथा घडते त्या नुसार ! त्या ठिकाणांची (locations) सखोल माहिती निर्माण करावी लागते. उदा. बगंला आहे तर त्यात असणारे फर्निचर, जिना, तिथली श्रीमंती, ( असलेली किंवा नसलेली) तिथले कारपेट, दरवाजा, खिडक्या इ. सारे डीटेल्स निर्माण करावे लागतात. कोणत्या वेळेला आपले पात्र (character) जिन्यात असेल ? कधी खिडकीत असेल ? त्याच्यावर प्रकाश कसा किती असेल ? आजूबाजूला कोणते आवाज येत असतील ? कोणत्या ठिकाणी तो कसा बसेल ? कसा उठेल ? धावेल ? काय काय करेल ? आणि ते प्रेक्षकांना कसे दिसेल ? चित्रपट लेखकाला हे सारे सुसंगत रीतीने मांडावयाचे असते.
याचा सर्वचा अर्थ असा नाही कि स्क्रीन रायटरला उत्कृष्ट sound engineer, Cinematographer, set designer, किंवा Electrician  असण आवश्यक आहे. स्क्रीन रायटरला डायरेक्टर पेक्षा जास्त नॉलेज असायला हवं की लीडिंग एक्टरच कौशल्य असायला हव ? तर असं नाहीये, पण स्क्रीन रायटरला हे सगळे कसे होईल ? जमेल कि नाही याचा अंदाज असायला हवा. आपण जे लिहितो आहोत ते पडद्यावर आणण्या साठी काय करावे लागेल ?  ते कसे होईल हे समजलेले असले तर आपण ते ठाम पणे लिहू शकतो ! अमुक घटना किंवा दृश्य दाखवता येणार नाही ते टाळून वेगळ्या प्रकारे कसे दाखवता येईल यावर आपण विचार करू शकतो.

कथा  (story)
एक राजा होता ! तो खूप शूर होता आणि त्याच खूप मोठ राज्य होत. त्याची एक राणी होती ती खूप सुंदर होती. त्या दोघांची एक राजकन्या होती. राजकन्या खूप सुंदर आणि हुशार होती. एकदा शिकार करतांना तिची शेजारच्या देशाच्या राजकुमारा शी अचानक भेट घडली. राजकुमार राजबिंडा आणि देखणा होता. दोघे एकमेका कडे आकर्षित झाले. दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले. त्या दोघांचा विवाह ठरला. पण राक्षसाने राजकन्येला पळवून नेले. राजकुमार तिच्या शोधात निघाला. राक्षस खूप शक्तिशाली आणि जादूटोणा करणारा होता. राजकुमार त्या बलाढ्य राक्षसाशी कसा सामना करेल अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. पण राजकुमाराने आपल्या कौशल्य आणि शक्तीच्या बळावर राक्षसाचा वध केला आणि राजकन्येला सोडवून आणले. नंतर दोघांचा विवाह झाला. The End.
समजा अशी आपली कथा आहे. खर पाहता हीच एकमेव कथा आहे. ह्या कथेत राजा राणी राजकन्या आणि राजकुमार बदलत असतात. राजा प्राण राक्षस प्रेमनाथ राजकन्या डिम्पल कपाडिया आणि राजकुमार ऋषी कपूर  असला तर हि बॉबी ची कथा होते आणि बदलले सनी देओल इ. केले तर बेताब ची होईल. आणि आपण आपल्या कल्पनेच्या  सहाय्याने ह्या राजा राणी राजकन्या राजकुमार आणि राक्षस ह्याच्यात आमुलाग्र बदल केला. हे सारे कुठल्याश्या दुसऱ्या ग्रहावरचे जीव आहेत असे दाखवले तर आपली कथा एकदम आगळी वेगळी होते.
ह्या एका दृष्टीने लेखकाला स्वातंत्र अफाट आहे. जे न देखे रवि ते देखे कवी असे म्हटलेले आहे ते खोटे नाही. आणि आताश्या डिजिटल क्रांती झालेली आहे. तुम्ही कल्पना कराल ते दाखवता येते. आपण ह्या अफाट स्वातंत्र चा उपयोग करू जातांना भरकटतो. खूप काही काही दाखवावे ह्या हव्यासापोटी कथे मधली भावनिकता जपायला विसरतो. आताश्या येणाऱ्या चित्रपटातून हे सारखे जाणवते. टेक्नोलॉजी काहीशी अंगावर येते. खूप भव्य दिव्य सेटिंग,कॅमेरयाच्या खूप खालीवर होणाऱ्या हालचाली.  डोळे दिपवणारा प्रकाश ……… हे सगळ खूप होत आणि ज्या भावनेने आपल मन भिजायला हवं ते कोरडाच राहत ! सगळ छान असूनही ते भावात नाही. असा का होत तर ह्याच कारण आपण व्यर्थ त्या गोष्टींना भाळलो आणि आपली गोष्ट परिणाम कारक करण्यासाठी फक्त टेक्नोलॉजी वर विसंबून राहिलो. आपल्या व्यक्तिरेखा कमजोर राहिल्या. पर्यायाने आपली कथा सशक्त होवू शकली नाही.
ह्याचा अर्थ असा मुळीच नाही कि टेक्नोलॉजी काहीच कामाची नाही. ती खूप उपयोगाची आहेच. पण ती कथेच्या भावानिकतेला बळ देणारी व्हायला हवी. उत्कृष्ट सिनेमा साठी नेहमी कथा जास्त महत्वाची आहे टेक्नोलॉजी त्या खालोखाल. कथेच्या प्रसंगांना, व्यक्तिरेखांना उठाव देण्यासाठी टेक्नोलॉजी चा यथोचित वापर अवश्य करावा. तसेच टेक्नोलॉजी चा उचित वापर करण्यासाठी कथेमध्ये नाविन्य आणावे जे परिणाम कारक होईल. याचे उत्तम उदाहरण आहे हॉलीवूड चा “अवतार” ! विचार करा आपल्या किती  भारतीय सिनेमाची कथा अशी होती
“ हिरो एखाद्या राज्यात किंवा हवेलीत किंवा स्मगलरच्या गन्ग मध्ये शिरतो काहीतरी महत्वाचे  चोरण्या साठी ! पण तेथील मुलीच्या प्रेमात असा अडकतो कि तिच्याच साठी आपल्या  पूर्वीच्या सहकार्यांशी लढतो.” हि कथा अवतार ह्या चित्रपटातून किती नाविन्य पूर्ण रीतीने, टेक्नोलॉजीचा पुरेपूर आणि यथोचित वापर करत प्रेक्षकांना क्षणोक्षणी सुखद आश्चर्याचे धक्के देत एक अविस्मरणीय अनुभव देवून जाते. एखाद्या घासलेल्या कथेच पुनरुजीवन कसे होते याचे हे उदाहरण आहे. सिनेमा लेखकाला आपल्या कल्पनेशी, आपल्या सृजनशीलतेशी असा विलक्षण संघर्ष देत कथेला आकार द्यायचे असतो. अजून काही तरी नवीन करता येईल हि तहान लेखकाने सदैव जीवंत ठेवली पाहिजे. हे दुष्कर काम कसे सोपे करावे ते आपण उद्या पाहू !                      मार्च २०

कथा विश्लेषण  (story Analysis)
एक राजा होता !  त्याची एक राणी होती. त्या दोघांची एक राजकन्या होती. राजकन्या खूप सुंदर आणि हुशार होती. एकदा शिकार करतांना तिची शेजारच्या देशाच्या राजकुमारा शी अचानक भेट घडली. राजकुमार राजबिंडा आणि देखणा होता. दोघे एकमेका कडे आकर्षित झाले. दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले. त्या दोघांचा विवाह ठरला. पण राक्षसाने राजकन्येला पळवून नेले. राजकुमार तिच्या शोधात निघाला. राक्षस खूप शक्तिशाली आणि जादूटोणा करणारा होता. राजकुमार त्या बलाढ्य राक्षसाशी कसा सामना करेल अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. पण राजकुमाराने आपल्या कौशल्य आणि शक्तीच्या बळावर राक्षसाचा वध केला आणि राजकन्येला सोडवून आणले. नंतर दोघांचा विवाह झाला. The End.                                      

१) ही कथा कुणाची आहे ?

अर्थात राजकुमार ची किंवा बरोबरीने राजकन्येची ! ह्यांना आपण हिरो आणि हिरोइन म्हणतो. ह्यांच्या बद्दल आपणास म्हणजे प्रेक्षकास खूप सहानुभूती असते. प्रेक्षक ह्या व्यक्तिरेखेच्या बाजूनी असतो. काहीही झाले तरी आपला हिरो जिंकला पाहिजे अशी आपल्या मनाची ओढ असते. हिरो संकटात सापडला कि आपण अस्वस्थ होतो. आणि तो संकटातून सुटला हि आपण निश्वास सोडतो. हिरो संबधी हे असं होत म्हणून खऱ्या अर्थाने हि गोष्ट त्याची असते. आपण त्यालाच नायक  म्हणतो. तर नायकाची व्याख्या अशी करता येईल-
             “ज्याच्या बद्दल प्रेक्षकांना सर्वात जास्त सहानुभूती असते आणि ज्याला काहीतरी मिळवायचे असते (प्रसंगी काहीतरी संकट दूर करावयाचे असते) त्याला नायक म्हणतात.”
नायक स्री किंवा पुरुष असू शकतो तसेच नायक एक दोन किंवा चार पाच हि असू शकतात. पण प्रेक्षकांवर सयुक्तिक प्रभाव पाडण्या  साठी एक नायक ठेवणे सोयीचे असते. ह्या व्यक्तिरेखेला कथे मध्ये अनन्य साधारण महत्व असते. त्याच्या स्वभावात दिसण्यात  बऱ्याच चांगल्या गोष्टी आणावयाच्या असतात. लेखकाला हे सार कौशल्याने करावयास हवे असते. चांगला नायक घडवतांना त्याच्यात खूप जास्त न पटणाऱ्या, न भावणाऱ्या, वास्तवापासून जरा जास्त दूर गेलेल्या गोष्टी केल्या तर तो आपला योग्य प्रभाव गमावून बसतो. हि तारेवरची कसरत जमवली पाहिजे.  ती कशी जमेल ?                                                                          

२) नायकाचे ध्येय (Want of Hero)

नायकाला (अर्थात ज्याची हि कथा आहे), काहीतरी हवे असते. त्याला हवे असलेले ते जितके मिळवावयास कठीण तितके ते मिळवण्याचे नाट्य प्रभावी होते. नायकाचे ध्येय जर खूप सर्व सामान्य असेल तर प्रेक्षकांना त्यात रोमांच ( Thrill ) जाणवणार नाही. त्याच प्रमाणे नायकाचे ध्येय जर अगदीच असाध्य (impossible )असेल तर ते प्रेक्षकांना पटणार नाही. हे खूप महत्वाचे सूत्र आहे . हा समतोल ज्या लेखकाला राखता आला तो जिंकलाच म्हणून समजा ! नायकांच ध्येय जितक आगळ वेगळ, कठीण असाध्य वाटणार पण साध्य होणार ------ हे शोधन आणि प्रभावी रीतीने दाखवण्या साठी लिहीण हा सर्वात महत्वाचा भाग चित्रपट लेखकाला जमला पाहिजे. लगान ह्या सिनेमात भुवन(आमिर खान)  ह्या व्यक्तिरेखेला लगान पासून मुक्तता हवी असते. त्यासाठी तो दुप्पट लगान ची जोखीम पत्करतो. कहाणी   मध्ये विद्या बागची (विद्या बालन) हिला तिच्या पतीची हत्या करणाऱ्या ला मारायचं असत. म्हणून ती गरोदर बनून फिरते व स्वत:चा जीव धोक्यात घालते. ह्यातून एक आणखी गोष्ट लक्षात घेण्य सारखी आहे ती अशी कि लेखकाला आपल्या नायकाला संकटात टाकावे लागते, आणि धक्का दायक रीतीने वाचवावे लागते. ह्या बद्दल आणखी सखोल विचार आपण पुढे करू.
                                                                                                                                     

३) खलनायक (Villain)

नायकाला जे काही हवे असते त्यात येणारे अडथळे म्हणजे खलनायक ! ते नैसर्गिक असू शकतात, मानवी असू शकतात, आश्चर्य असे कि स्वत: नायकाने निर्मिलेले हि असू शकतात. (त्याने केलेल्या चुका). कधी कधी नायक स्वत: खलनायक असतो किंवा होतो. उदा, हिम्मत हरवून बसलेला नायक, मग त्याला उत्साहित करण्या साठी त्याचे मित्र किंवा नायिका गाणे गाते इ. काहीतरी करून त्याच्या आत एक जोश निर्माण केला जातो. पण सहसा आपण खूप चांगल्या रीतीने ओळखतो तो नायकाला पावलो पावली नडणारा खलनायक अमरीश पुरी !
खलनायक हि प्रेक्षकांना न आवडणारी व्यक्तिरेखा असते. पण जोवर हा न आवडणारा खलनायक येत नाही तोवर प्रेक्षकांना सिनेमा अळणी वाटतो. हा खलनायक जितका नामोहरम करण्यास कठीण तितका नायकाला प्रभावी होण्यास जास्त वाव मिळतो. इथेही लेखकाच्या हातून गल्लत होते कि खलनायकाला वाईट घडवता घडवता तो इतका वाईट बनतो कि प्रेक्षकांना तो पचत नाही. म्हणजे पटत नाही. तो डेंजर असावा त्याच प्रमाणे वास्तवा पासून खूप दूर नसावा. किंबहुना खलनायक जर वास्तव वाटणारा असेल तर तो जास्त प्रभावी ठरतो. “दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे “मध्ये अमरीश पुरी खलनायक म्हणून आवडत नसला तरी बाप म्हणून आवडतो. आणि शेवटी खलनायक हरल्याचा आनंद देत देत बाप हरल्याच दु:ख हि प्रेक्षकांना हेलावून जात. खल नायक नेहमी हरतोच असाही नाही. काही कथानकात तो जिंकतो सुद्धा !
खलनायक नायकाच्या विरोधात जे काही करतो ते जर नैतिकतेच्या किंवा कायद्याच्या दृष्टीने बरोबर असेल तर तो खलनायक जास्त प्रभावी ठरू शकतो. खलनायकाची बाजूही आपणास जेव्हा योग्य वाटते उदा. आपला झालेले घोर अपमान त्याचा बदला घेन्या  साठी तो खल प्रवृत्ती झाला आहे. बहुधा दोन भावांच्या कथेमध्ये असा प्रकार आढळतो. “आंखे “ मधला बँक रॉबरी करणारा मनेजर अमिताभ ! खूप बुद्धिमान खलनायक ही चित्रपटाला निश्चित उंची देतो.
आपल्या कथेच्या मर्यादा सांभाळून आपण असे काही करण्याचा प्रयत्न करावा.
एकंदर काय तर खलनायक प्रभावी असावा, म्हणजे त्याचा नायकाशी होणारा संघर्ष प्रभावी होतो     

४) सहाय्यक व्यक्तिरेखा (supporting characters)

    नायकाला हव्यासाने हवी असलेली गोष्ट मिळवण्या साठी सहाय्यक व्यक्तिरेखा त्याला मदत करतात. पण लक्षात घ्या कि व्यावहारिक जीवनात असे कुणीतरी असते का की जे फक्त दुसऱ्या कुणाला तरी मदत करतात.  त्यांना व्यक्तिश: काहीही नको असते ? उत्तर मिळेल नाही ! प्रत्येकाला स्वत:ला काहीतरी हवे असते ! नेहमी , क्षणो क्षणी, पावलो पावली ! तसेच ह्या सहाय्यक व्यक्तिरेखानाही काही तरी हवे असतेच, ते नायकाच्या ध्येयाशी मिळते जुळते असते. किंवा नायकाला जे हवे ते त्याला मिळतांना ह्यांना जे मिळेल ते त्याचे स्वत:चे ध्येय असते. समजून घ्या ते त्यांचे ध्येय असते ……… ठरते असे नव्हे ! सहाय्यक व्यक्तिरेखेच्या स्वभावाला परिस्थितीला वास्तविकतेला ते मिळते जुळते असावे. अन्यथा त्या व्यक्तीरेखे वर अन्याय होतो. आणि ती व्यक्तीरेखा (Character) प्रेक्षकांना भावत नाही. कथा अश्या ठिकाणी कमजोर होते. सहाय्यक व्यक्तिरेखा घडवतांना हा असा सर्वांगीण विचार व्हायला पाहिजे असतो. दामिनी ह्या सिनेमा तली वकील (सनी देओल) ची भूमिका त्याला दामिनी ह्या नायिकेला न्याय मिळवून देतांना स्वत:लाही समाधान मिळवायचे असते. नायकाचा संघर्ष जितका महत्वाचा तितकाच महत्वाचा सहाय्यक भामिकांचा ही असतोच.
सपोर्टिंग character हे नेहमी नायकाला मदत करणारेच असेल असा काही नियम नाही. ते नायकावर असलेल्या प्रमापोटी किंवा अन्य काही कारणामुळे नायकाला विरोध करणारेही असू शकते. उत्साहित motivate करणारेही असू शकते. विरोध करता करता अचानक मदत करणारे हि होवू शकते. हजार शक्यता असतात, लेखकाने त्या पडताळून पाहायला हव्यात.
सहाय्यक भूमिका कधी कधी खलनायकी सुद्धा असू शकते. त्यावेळी त्याच्यात खलनायकी गुण त्याच प्रमाणे असायला हवेत. पुढे व्यक्तिरेखा ची घडण ह्याबद्दल आणखी विस्ताराने विचार करू.     

मंगळवार, २३ एप्रिल, २०१३

श्री गणेशा



कथा - पटकथा - संवाद
आपण ह्या ब्लॉग वरून चित्रपट कथा पटकथा आणि संवाद लेखणाचे  तंत्र जाणून घेणार आहोत.
अभ्यासू मित्रांनी याचा लाभ घ्यावा.

श्री गणेशा
     
  श्री गणेशा करतांना काही आत्म परीक्षणाची गरज आहे. चित्रपट क्षेत्राच जे आकर्षण आपणास आहे ते कितपत योग्य आहे ? आपल्या आंत आपल्या विचार प्रक्रियेत आपल्या  कल्पना शक्तीला हा भार पेलणार आहे का ? आपल्या मेन्दु मध्ये हे सॉफ्ट वेअर आहे का ?
  आपणास जन्मा सोबत आई वडिलांच्या कडून शरीर, आणि  सोबत काही मानसिक गुणसूत्र हि मिळालेली असतात. कदाचित असेल पण मागील जन्माचे संस्कार हि आपल्यावर येत असावेत ? ह्या सर्वातून आपल्या क्षमता तयार होतात. आपणास खरोखर चांगली कथा सुचते का ? आपल्याला सुचलेली कथा कुणाला आवडते का ? आपले मित्र परिजन कधी कधी आपणास मन राखण्यासाठी खोटच बोलतात,
"अरे वा छान कथा आहे तुझी ! "
"तू ह्याच चित्रपट बनवच !"
"तू उद्याचा स्टीवन स्पीलबर्ग च आहेस !" काय बोलतील याचा नेम नाहीच, पण त्याची अभिरुची कितपत प्रगल्भ आहे ? त्याचा अनुभव काय ? यावर त्याच्या वक्तव्याचा आपण विचार करावा. खूप वाचन कराव. खूप चित्रपट पाहावेत. आपल्या कथांनां कल्पनेच्या चित्रपट रुपात पाहून तारतम्याने विचार करावा. ह्या साठी आपल्याला आपला तिसरा डोळा वापरायचा असतो, अर्थात, प्रेक्षकांच्या नजरेतून बघता आले पाहिजे.
ह्याचे महत्वाचे कारण असे आहे की, ज्यांना चित्रपट बनवता येत नाही ते जर गप्प बसले तर खूप दर्जेदार चित्रपट तयार होतील. कमी बनतील पण चांगले बनतील. जे प्रेक्षकांना खूप  रंजक असे अनुभव देतील. आजकाल खुपदा प्रेक्षकांची फसवणूक होते, ते ज्या अपेक्षेने थिएटर मध्ये जातात आणि तोच तोच लेबल बदललेला मसाला पाहून हैराण होतात . आणि चित्रपट गृहात कधीही न जाण्याचा निर्णय घेतात. हा निर्णय फार काळ टिकणारा नसेल पण तो चित्रपट व्यवसायाला निश्चितच घातक आहे.
तसेच आपली योग्यता नसतांना ह्या क्षेत्रात आलात तर तुम्हालाही तुमचे ध्येय गवसणार नाही. उलट कुणाच्या तरी मार्गात तुम्ही अडथळा ठरू शकाल.
तर आपल्या आंत ती क्षमता आहे अशी खात्री झाली कि मग हवी आहे ती प्रचंड अभ्यासाची जिज्ञासा. कथा हा सर्व उत्कृष्ट चित्रपटांचा आत्मा आहे. पाया आहे. ज्यावर एका उत्कृष्ट सिनेमाची बिल्डींग उभी करायची आहे ती जमीन म्हणजे कथा. त्यात नाविन्य असायला हवं. ती मनाला थेट भिडणारी असावी. सिनेमाच्या उंचीचा भार तोलणारी असावी. आणि ती बनवणारा लेखक तितक्याच क्षमतेचा असायला हवा.
खूप वाचन हा एकमेव मार्ग आहे चांगला लेखक होण्याचा.

वाचन
खूप वाचन हा एकमेव मार्ग आहे चांगला लेखक होण्याचा. कारण वाचन ही खऱ्या अर्थाने सृजनशील creative काम आहे. तुम्ही जेव्हा वाचन करीत असता तेव्हा स्वत:शी लक्षपूर्वक पहा तुमच्या मनात काय चाललेले असते ? जे तुम्ही वाचत असता ते दृश्य रूपाने मन:चक्षु in your mind समोर तुम्हाला दिसत असते. लेखकाने लिहिलेलि माहिती तुम्हाला फक्त मदत करीत असते.
उदा. तुम्ही वाचत आहात की, “शाम जिना चढून वरच्या खोलीत गेला.” तुमच्या मनात गोल लोखंडी जिना आला असेल ! पण लेखकाने लिहितांना सरळ, लाकडी, जिण्याची कल्पना केली असेल. अश्या प्रकारे लेखकान केलेला संपूर्ण विचार तुमच्या मनात जसाच्या तसा येत नाही. तो तुमच्या डोक्यातल्या काही कल्पनाचा आधार घेत घडत असतो. आणि हळूहळू तुमच्या आतला लेखक घडवत असतो. एकदा तुमच्या आतील सृजनशीलता (creativity) कार्यान्वित (activate) झाली कि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला तुमची वेगळी दृष्टी (vision) मिळू लागते. तुम्ही एखादा सिनेमा बघता, तुम्हाला वाटते की हा सीन आवश्यक नव्हता. हा सीन थोडा नंतर दाखवला असता तर प्रेक्षकांना खिळवून ठेवता आल असत. अस आतून सुचण सृजनशीलतेच लक्षण आहे. पण -
पण ही फक्त सुरुवात आहे. आपण बालवाडी म्हणू यात. म्हणजे काय आहे की तुम्हाला शिकण्याची इच्छा निर्माण झाली आहे. आता तुम्ही  प्रत्येक अनुभव वाचणा सारखा सृजनशील (creatively) रीतीने घेवू लागता. रस्त्याने दिसणाऱ्या साध्या घटनाही तुम्ही बारकाईने बघता. त्याच आतल्या आत वर्णन करू लागता. त्यात एक नाट्य बघू लागता. आता तुम्हाला बाराखडी शिकली पाहिजे. आता आपण इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला पाहिजे.

निरीक्षण
वाचन हा एकमेव मार्ग आहे चांगला लेखक होण्याचा. वाचन तुमची कल्पना शक्ती वाढवत. त्याच प्रमाणे तुमची निरीक्षण शक्ती हि वाढवत. तुम्ही वाचून अनुभवलेलं मन:चक्षुंनी पाहिलेलं, जसच्या तसं किंवा मिळत जुळत काहीतरी प्रत्यक्षात दिसत, तेव्हा तुम्ही त्यातले बारकावे निरखून पाहाता. अशी तुमची  निरीक्षण क्षमता वाढीस  लागते .  
समजा तुम्ही एक एक्सिडेंन्ट  संबंधी खूप छान वर्णन वाचलं आहे. आणि दोन चार दिवसातच तुम्हाला रस्त्या वर एक एक्सिडेंन्ट झालेला दिसला. तुम्ही त्या वाचलेल्या वर्णनाशी पहात असलेल्या दृश्याशी तुलना करता. दोन्ही अनुभवातून एक नवीन दृश्य तुमच्या मनात तयार होत जात.
मग हळूहळू अश्या बऱ्याच गोष्टी तुमच मन संग्रहित करायला सुरुवात करत. नाट्यपूर्ण दृश्यांची एक लायब्ररी तुमच्या अंतर्मनात तयार होत जाते. हि लायब्ररी तुमच्या लेखन जीवनाची शिदोरी आहे. ह्या बद्दल आपण पुढे बोलू. वाचनातून आणि निरीक्षणातून आपली हि शिदोरी आपल्याला ठासून भरून ठेवता आली पाहिजे.
रत्याने चालणारी माणसे, कशी चालतात ? त्यांची लकब कशी आहे ? ती का  असावी ? बोलण्याची ढब कशी आहे आणी  का असावी ? आपल्या नातेवाईकां मध्ये घडणाऱ्या घटना ! ऐकिवात येणाऱ्या घटना ! वर्तमान पत्रातील घटना ! टीव्ही न्यूज ! इंटरनेट ! अनंत मार्गाने अनंत दृश्य आपल्या भोवती प्रवाहित होत असतात. आपल्या अंतर्मनाने त्या टिपून घेतल्या पाहिजेत. ऐनवेळी त्या कश्या उपयोगात आणायच्या ते आपण पुढे पाहू.
पण निरीक्षणातून तुम्ही जतन करून ठेवलेल्या सर्व गोष्टी हा तुमचा अमुल्य खजिना ठरणार आहे. प्रत्येक निरीक्षण हे तुम्ही खरेदी करून ठेवलेली रिअल प्रापर्टी आहे. तुम्ही या जमिनीवर कधीही  चित्रपटाची बिल्डींग उभारू शकता.

चित्रपट पाहण्याची कला
चित्रपट पाहतांना इतर प्रेक्षकां सारखा तो एन्जॉय करणे चित्रपट लेखनात तितकेसे मदत करणारे ठरणार नाही.
चित्रपटाची कथा कशी होती ? हीच कथा आणखी वेगळ्या प्रकारे मांडता आली असती का ? कोणत्या प्रकारे मांडली असती तर ती जास्त परिणाम कारक झाली असती ? सिनेमाची गती कुठे मंदावली का ? आणि का ? तो सीन महत्वाचा नव्हता कि परिणाम कारक झाला नाही म्हणून तसे वाटते ? चित्रपटातील पात्र (characters) परिणाम कारक होती का ? त्यात विविधता होती का, की ती एकसुरी होती ? प्रमुख पात्र (Hero) चे ध्येय (want) काय होते  ?  त्याच्या ध्येयाच्या मार्गात अडथळे (villain) काय होते ? त्यांच्यातला संघर्ष (conflict) रोमांचक होता का ? हा संघर्ष उच्च  टिपेला  (climax)पोहोचला का ? ह्या महत्वाच्या घटकांचा सविस्तर विचार लेखकान करायला हवा. एक खरोखर चांगला असलेला सिनेमा तुम्हाला ह्या कामात अडचणी आणू शकतो.
चित्रपट जितका उत्कृष्ट असेल तितका तो तुम्हाला निरीक्षणाच कार्य करू देणार नाही. सिनेमा उकृष्ट म्हणजे तो त्याच्या भावना वेगात तुम्हाला वाहवून नेण्यात तो बलवत्तर ठरतो. तुम्ही  निरीक्षण करता करताच त्यातील दृश्यामध्ये हरवून जाता, मधेच तुम्हाला भान येते कि त्या ठिकाणी ते पात्र नेमके काय बोलले होते ? अमुक वेळेला अमुक ठिकाणी पाठीमागे कोण होते ? किंवा असेच काहीतरी आणि मग तूम्ही पुन्हा निरीक्षणाला सुरुवात करता . असे चित्रपटच तुमच्या लेखण क्रियेला मदत कानार आहेत. असेच चित्रपट आपण पुन्हा पुन्हा पहावयाचे आहेत. आणि ते अश्या पद्धतीने पाहायचे आहेत. अश्या दोन चार चित्रपटांचा अभ्यास त्याच्या स्क्रीनप्ले सोबत करणे खूप फायद्याचे ठरते. म्हणजे स्क्रीनप्ले मधून एक सीन वाचायचा, मनाशी विचार करायचा कि हा सीन पडद्यावर कसा दिसेल ? आणि मग तो प्रत्यक्ष पाहावा. स्क्रीप्ले मधल्या लिहिलेल्या शब्दांचा अर्थ पडद्यावर कळतो. लिहिलेले शब्द म्हणजे दिसणारे दृश्य असते. स्क्रीनप्ले ची भाषा आणि त्या भाषेचे व्याकरण जरा जरा कळू लागते. आणि इतर लिखाणापेक्षा (कथा कादंबरी नाटक ) स्क्रीनप्ले लिखाण कस वेगळ आहे हे उमगायला लागत. पटकथा संवाद लेखण शिकण्याची खरी सुरुवात होते.

नाट्यपूर्ण अनुभवांची भेळ  
वाचनातून, निरीक्षणातून, उत्कृष्ट चित्रपटातून आपण बरेच चांगले अनुभव मिळवलेत. पण ते आपणास चागला लेखक बनवण्यास नक्कीच कमी पडतील. सर्वात महत्वाचे म्हणजे हे सगळे अनुभव वापरलेले आहेत, खूप लोकांनी ते पाहिलेले किंवा वाचलेले आहेत. आपण निरीक्षणातून मिळवलेले अनुभव सुद्धा कच्चा माल (Raw material ) आहे. लिखाण सुरु करण्या आधी लेखका कडे अनुभवांचा अफाट खजिना असायला हवा. ह्या विश्वात अनंत गोष्टींचा अनंत विस्तार आहे. विचार करा आपण किती झाडं पाहिली असतील ? उत्तर नक्कीच न मोजता येणार असेल ! तुम्ही हे सुद्धा खात्रीशीर पणे सांगाल कि कोणतीही दोन सुद्धा एकसारखी नव्हती. कधीही कोणतेही दोन माणस तंतोतंत एकसारखी नसतात. जुळे भावंड ही तंतोतंत सारखे नसतात असले तरी स्वभावाने वेगळे असणारच. विविध अनुभवांनी स्वत:ला समृद्ध करणे हेच लेखकाचे पहिले प्रशिक्षण आहे.
दुसरी गोष्ट ह्या अनुभवांशी करावयाची असते ती अशी की, ह्या सर्व अनुभूतींना वेगवेगळे लक्षात ठेवायचे नाही. खरे पाहता ते शक्य नाहीच, पण तरीही कधी कधी हे कठीण काम करावयास आपले मन आपणास भाग पाडते. आपण हे विसरून जावू कि काय ? हा प्रश्न आपणास भेडसावतो. आणि आपण हा दुर्घट प्रयोग करू लागतो. त्यात आपली खूप सारी उर्जा वाया जाते असे मला वाटते. ह्या उलट ह्या सर्व अनुभवांची आपल्या मनामध्ये सरमिसळ झाली पाहिजे. ह्या सर्व अनुभवाच्या फापट पसार्याचे यथा योग्य रसग्रहण व्हायला पाहिजे. साध्या भाषेत पचन झाले पाहिजे. ह्यामुळे होते काय की, प्रत्येक प्रसंग वेगळा आठवला नाही तरी त्याचा परिपाक आतून (unconsciously) काम करतो. ह्या प्रकारे अंतर्मनातून आलेले वर्णन प्रेक्षकाच्या मनाचा ठाव घेवू शकते.
आपल्या अनुभवाची हि सरमिसळ आणखी एका प्रकारे उपयोगी पडते ती अशी, आपल्या स्मृतीतला एक अनुभव दुसऱ्या अनुभवा सोबत जुळतो आणि एक वेगळ परिणाम कारक रसायन हाती लागत.
उदा- आपण ऐकलेला एखादा खुनाचा प्रयत्न आणि बर्याचदा येणारा  मिसकॉल चा  आपण समन्वय केला. एखाद्या ठिकाणी खून होतो आहे आणि नेमका तिथेच कुणाचा तरी मिसकॉल येतो. हा फोन कुणाचा यावर खुनी घाबरतो. अश्या प्रकारे एखाद्या नाट्यपूर्ण प्रसंगाची निर्मिती होवू शकते.
माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की सगळे अनुभव विसरून जावेत. काही महत्वाच्या घटना लक्षात ठेवणे गरजेचे आहेच. पण त्या सर्वांची सरमिसळ करणही तितकाच आवश्यक आहे.
नाट्यपूर्ण अनुभवांची ही भेळ आपल्या लिखाणाला आगळी वेगळी लज्जत आणल्या शिवाय राहणार नाही.

भूक  
आपणास जश्या काही शारीरिक गरजा असतात. भुक तहान इ. तश्याच काही मानसिक गरजा असतात. त्यातली एक अक्राळ विक्राळ भूक असते कहाणी ची भूक ! आपण सदा सर्वदा कुठल्या ना कुठल्या कथेचा भाग असतो. आपल्या भोवतालचा प्रत्येक माणूस काहीना काही गोष्ट घडवीत असतो. तुम्ही गप्पा करतांना लक्ष देवून ऐका प्रत्येक जण काहीतरी बोलण्यासाठी धडपडत असतो. सकाळी ओंफीस ला येतांना अस अस घडलं ! बायको पाय घसरून पडली आणि अमुक टमुक  झालं ! मुलाच्या शाळेत घडलेली ! मित्राच्या घरी घडलेली ! कुणाच्या जन्माची ! कुणाच्या मरणाची ! कुणी मरता मरता वाचल्याची ! अनेक ! अनंत कथा सदैव आपण ऐकत असतो आणि सांगत असतो. आणि हे सुद्धा अपूर पडत की काय आपण झोपेतही कथा अनुभवतोच ……… आपण स्वप्न पाहतो.
आपल्याला टी व्ही अपुरा पडतो, आपण ब्रेक मधेही  लगेच दुसऱ्या चैनेल वर जातो.सीडी डीव्हीडी मोबाईल वर आय पॉड आणि काय काय साधन आपण निर्माण केलीयेत कहाणीचा अनुभव घेण्यासाठी ?  सिनेमा गृहे आताश्या जर ओस पडलीयेत पण तरीही शंभर करोडचा बिझिनेस होतोच ! माणसाला कहाणीच्या अनुभवाची नितांत गरज आहे.
हे अस  का  होत ? का माणूस सदा सर्वदा कोणत्या तरी कहाणीचा भाग असतो. ? कारण असं आहे कि कथा ही माणसाच्या जगण्याच अविभाज्य साधन आहे. कथा आपल्याला बौद्धिक आणि भावनिक खाद्य पुरवते. ह्यात कथेतून आपली बौद्धिक भूक फार कमी प्रमाणात पूर्ण होते, पण भावनिक भूक फार मोठ्या प्रमाणात भागते. किंबहुना भावनिक भूक भागवण्या साठीच आपल्याला कथा अनुभवावी लागते.
अतिशय महत्वाची गोष्ट चित्रपट कथा लिहिणाऱ्या लेखकाला लक्षात घ्यायला हवी ती हीच की आपल्या कथेतून श्रोत्यांची किंवा प्रेक्षकांची भावनिक भूक भागवता आली पाहिजे.
ह्यात एक बारकावा लक्षात घेण्या सारखा आहे कि आपणास असे वाटेल माणसाला आनंदित व्हायला आवडेल, रोमांटिक व्हायला आवडेल ! आणि अश्या काही छान छान सुखी समाधानी गोड गोड अनुभवच माणसाला आवडतील. पण कथेच्या बाबतीत असे नाही. कथेत माणसाला त्याच्या अभिरुची नुसार कमी जास्त पण सगळेच अनुभव घ्यायला आवडतात. त्याला घाबरायला ही आवडत ! त्याला संकटात पडायलाही आवडत ! त्याला धोक्याच्या , प्रसंगी मरणाच्या जवळून जायलाही आवडत !
महत्वाच कारण अस आहे  की, कथा खोटी असते ! जे काही होणार आहे ते कागदावर आपल्यासाठी पडद्यावर होणार असत. जे अनुभव खऱ्या जगण्यात घेता येत नाहीत तेच माणसांना चित्रपटात घेता येतात. आणि हे होण्यास त्यांना मदत कारण हेच कथा लेखकच काम होवून बसत. अश्या कथांचा शोध कसा घ्यावा ?

चित्रपट लेखकाचे ध्येय  
चित्रपट लिखाणास सुरुवात करतांनाच लेखकाला आपले ध्येय निश्चित करावयास पाहिजे. साधारणत: नवोदित लेखक एखाद्या सुपर हिट चित्रपटाने झपाटलेला असतो. त्या चित्रपटाच्या यशाला पाहून मोहात पडलेला असतो. त्यातल्या सारखे दिसणारे, वागणारे पात्र योजना, त्या कथेशी मिळती जुळती कथा, किंवा कथेचा विषय इ.
हे करण्यात  कदाचित व्यावसाईक यशाचे गणित जुळते पण ते एक मर्यादित यशच फक्त देवू शकते. ह्याप्रकारे केलेल्या कलाकृतीला अद्वितीय यश किंवा मान्यता मिळू शकत नाही. प्रतिथ यश म्हणजे सुपरहिट चित्रपटांच्या पावलावर पाऊल टाकून तयार केलेल्या चित्रपटांचा इतिहास पाहिला तर हे सहज लक्षात येईल.
त्यामुळे सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्यावयाची ती ही की, आपण स्वत;ला अनुकरण करण्यापासून वाचवावे. अति उत्तम अनुकरण सुद्धा कधीही सृजनशील(creative) असू शकत नाही.
मग नव्या चित्रपट लेखकाने काय करावे ? तर ह्या सुपरहिट चित्रपट मधून हा अभ्यास करावा की ह्या लेखक किंवा दिग्दर्शकाने कश्या प्रकारे नाविन्याचा शोध घेतला आणि तो काय काय करून परिणाम कारक बनवला. त्या पद्धतीने आपणही आपल्या आसपास निरीक्षणातून लोकांच्या जीवाभावाचे विषय शोधावेत. वेगवेगळे कथासूत्र चर्चा करून सामान्य माणसांची रुची ओळखता येवू शकते. लहान मुलही ह्या बाबतीत खूप मदत करू शकतात. मुलांना आपल्या मनातली गोष्ट सांगावी (अर्थात मुलांच्या योग्य असेलतर) मुल जर कुतूहलाने भरून जात असतील तर ती गोष्ट परिणाम कारक आहे असे मानण्यास हरकत नाही. अश्या विविध प्रकारे आपला विषय नक्की करावयाचा असतो.
चित्रपट लेखकाच कार्य इतर लेखकापेक्षा बऱ्यापैकी खडतर असत. सर्व साधारण कथा कादंबरी इ. लेखकांच लिखाण सरळ सरळ वाचकाच्या हातात जात, आणि आपला परिणाम साधत. पण चित्रपट लेखकाची संहिता कुणी वाचत नाही, वाचू शकत ही नाही. सामान्य वाचकाला ती समजणार ही नाही. येथे त्या संहिते वरून तयार झालेला चित्रपट प्रेक्षकांच्या समोर येतो. ज्याच्यावर अनेक जणांनी आपले संस्कार केलेले असतात. दिग्दर्शकाने सांगितल्या प्रमाणे अभिनेते काम करतात. पण सारे अभिनेते आपापली छाप सोडून जातातच. वेशभूषा रंगभूषा कर आपापले संस्कार करतात. हे सारे छाया चित्रकार आपल्या तऱ्हेने चित्रित करतो. एडिटर आपले संस्कार करतो आजकाल व्ही एफ एक्स आणि कम्प्युटर ग्राफिक्स इ. अनेक संस्कार होतात. त्यानंतर लेखकाची कलाकृती प्रेक्षकाच्या समोर जाते. ह्या सर्वांचे संस्कार काय होतील ह्याचे भान ठेवून लेखकाला लिहायचे असते. आणि हा प्रकार बर्यापैकी कल्पनेला त्रासवणारा , शीण आणणारा असतो.